Thursday, July 8, 2010

'क्षण तुझे माझे....' (पहिली भेट)

आयुष्याच्या सांजवेळी
सूर्योदय तू झालास
भेट घेऊन नात्यात
क्षण होऊन आलास!

जाणले असे तुलाच मी
मैफल तुझी सजताना
भारावले मनातून असे
शब्दांत जाऊन बसताना......
शब्द देऊन प्रीतीला
काव्य घेऊन आलास!

मनात उतरलास माझ्या
संवाद ऑनलाईन करताना
ओंजळ केलेस मला तू
तिच्यात काव्य भरताना.......
काव्य देऊन अंतरी या
जाणीवा घेऊन आलास!

पहिली भेट नात्याची
उरली तुझ्यात भेटताना
दिलीस हाती सोबतीची रेष
क्षण त्यातून निसटताना........
सोबत देऊन एकांती
भाग्य घेऊन आलास!

तू बनवलेली कॉफी
ओठांत तेव्हा मुरताना
श्वास तिनेही दिला
अस्तित्त्व माझ्यात उतरताना........
ओठ देऊन श्वासांना
नातं घेऊन आलास!

बहकला पाऊस दोघांतला
खिडकीत उभं असताना
खुणावते नजर दोघांना
अंतर मनाचे नसताना......
अंतर देऊन दुराव्याला
स्पर्श घेऊन आलास!

जपलास श्रावण आपला
एकाच छत्रीत शिरताना
सावरलेस मीठीत तुझ्या
मी न मलाच स्मरताना......
पाऊस देऊन सोबतीचा
गारवा घेऊन आलास!

थांबला क्षण हा आता
डोळ्यांत श्रावण उरताना
दिलीस ओढ भेटीची
क्षणात भेट ही झुरताना.....
क्षण देऊन तुझ्यात मला
आठवण घेऊन आलास!
पुन्हा पहिल्या भेटीची
आस ठेऊन गेलास!

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २८.०६.२०१० सोमवार
वेळ : रात्री १.५५