Thursday, May 6, 2010

'तुझ्या रातीच्या स्वप्नात.........'

धुंद हा एकांत साजणा
रात मजला शहारते
चांदणे स्पर्शात तुझ्या
मन का हे बावरते!

रातीचे तू स्पर्श माझे
पहाटवारा तूच तू
चांदण्यांच्या मधुर स्वप्नी
छेडीतो तो चंद्र तू!

प्रीत घेऊन आज आली
रात माझी स्वप्नवेडी
स्वप्न घेऊन आज कुणी
का मनाची तार छेडी!

गंधाळली रात माझी
घेउनी श्वास तुझे
मीठीत का सांग आज
सुखावले आभास माझे!

सरते रात कुशीत तुझ्या
चांदण्यांत मजला नेते
मिटल्या पापण्यांवर का रे
तुझेच स्वप्न देते!

ये असाच चंद्र होऊनी तू
एकांत रातीला उरणार नाही
तुझ्याविणा स्वप्नातही साजणा
रात माझी सरणार नाही
रात स्वप्नात उरणार नाही...........

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
०६.०५.२०१० गुरुवार
वेळ : पहाटे ५.४५