Monday, June 28, 2010

'घे हवे जे तुझ्यासाठी'

रात होऊन चांदणी, चंद्रात पेटते आग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

बघ माझी रात दिवाणी
तुझ्यासाठी थांबली
चंद्राची नशा पाहून
आणि काही लांबली
इथेच आजवरी, स्वप्नात येऊन जाग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

मिटल्या डोळ्यांत स्वप्न
स्पर्शात येता येतात
ओठावरी थांबून राती
तुला तुझे देतात
इथेच आजवरी, माझा होऊन वाग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

कुठली ही जादूगारी
कुठली नशा ही
चांदण्यांना खुणावते
चांदवेडी भाषा ही
इथेच आजवरी, दे रातीचा राग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

सांग त्या श्वासांनाही
सावर तुझे तुला
आवर घालू कसा आता?
कळेना माझेच मला
इथेच आजवरी, श्वास घेण्या लाग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

कसा हा खुळावला
क्षण माझा चोरटा
जपतो सारे आठवांत
राती झुरतो एकटा
इथेच आजवरी, क्षणांना साथ माग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २७.०६.२०१० रविवार
वेळ : रात्री १.४८

(टीप : चंद्रात पेटते आग रे ..........त्याला ओढ आहे रातीची असा म्हणायचं आहे इथे!
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे.........इथे क्षणाची देवाण-घेवाण व्हावी असं सांगत आहे! )

Thursday, June 24, 2010

'अंतर'

मला कळतंय मी चुकले
तुझ्या ओढीत असते ना......
तू नसता क्षणात माझ्या
आठवणीत जाऊन बसते ना......

अंतर आहे वयात
नात्यात अंतर देऊ नकोस
भेट रोजची शक्य नाही
आठवणीतून जाऊ नकोस
कळतंय तरी आठवणीत
तुला आणून फसते ना........

अंतर आहे शब्दांत
अर्थात अंतर देऊ नकोस
रोजचा संवाद शक्य नाही
विचार टाळण्या येऊ नकोस
कळतंय तरी विचारात
तुलाच मी त्रासते ना.........

अंतर आहे वेळेत
क्षणात अंतर देऊ नकोस
क्षण जपणे शक्य नाही
खंत वेळेत घेऊ नकोस
कळतंय तरी सरल्या क्षणात
तुझीच मी असते ना..........

अंतर आहे प्रीतीत
मनात अंतर देऊ नकोस
प्रीत बोलणे शक्य नाही
बहाणा मात्र होऊ नकोस
कळतंय तरी बहाण्यात
प्रीत होऊन मी असते ना.........

अंतर आहे श्वासात
ओठांत अंतर देऊ नकोस
स्पर्श देणे शक्य नाही
स्वप्नात काही घेऊ नकोस
कळतंय तरी स्वप्नात
तुझी होताना दिसते ना........

अंतर आहे दोषात
घेण्यात अंतर देऊ नकोस
समजून घेणे शक्य नाही
जगाचे दोष घेऊ नकोस
कळतंय तरी दोषात
तुझेच जग मी असते ना.........

अंतर आहे कळण्यात
जाणीवेत अंतर देऊ नकोस
साथ देणे शक्य नाही
एकांती तरी ठेऊ नकोस
कळतंय तरी अंतरात
ओढ जीवाला भासते ना.........
अंतरात मीच असते ना.........

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २४.०६.२०१० गुरुवार
वेळ : सकाळी ८.००

Tuesday, June 22, 2010

'नातं......नाव नसलेलं.......'

मला जगायचंय ते नातं......
तुझ्यासोबत.....
ज्या नात्याला नाव देता येत नाही....
पण...
ते खास असतं........नात्यासारखच.......


त्या नात्यात रुजायच आहे.....
भिजायचं आहे........
क्षण अन क्षण जपायचे आहेत.....
नात्यासोबत.........
ते नातं घेऊन.....
ते नातं देऊन.....


नातं कसही असेल....
कधी प्रेम देणारं......
कधी रुसणार........
कधी भांडणार......आणि....
कधी फार फार जवळ घेणारं........
असं नातं तुझ्यात पाहिलंय मी.....
जगायचंय त्या नात्यात मला.....
तुला सारं देऊन........
तुझं सारं घेऊन........


कधी त्या नात्यात गुंतायचं आहे.....
कधी उकल होऊन सुटायचं आहे......
असं नातं...........
जे दूर दूर घेऊन जातं.......
साऱ्या जाणीवा बाजूला ठेवून........
ते नातं.........
श्वासात द्यायचंय........
कधी शब्द देऊन......
कधी शब्द घेऊन......


अशा नात्यात आयुष्य काढता येत नाही......
पण....आयुष्य जगतं त्यात.....
जगण्याला आयुष्य मिळतं त्यात........
चार दिवसाचं नातं........
चार क्षणाचं नातं..........
पण.....एक प्रामाणिक नातं..........
तुझ्यात जगू लागलंय........
मला मागू लागलंय...........
माझ्या भासांना अस्तित्त्व देऊ लागलंय.........
त्या नात्यात येण्यासाठी........
त्या नात्यात देण्यासाठी.........
त्या नात्यात काही घेण्यासाठी.........
असं हे नातं...........
तुझं...........माझं..........
नाव नसलेलं................

स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २१.०६.२०१० सोमवार
वेळ : रात्री १२.१५

'शब्द'

क्षण माझे दुरावताना
तुझ्यापाशी आले
शब्द घेऊन ओंजळीत
शब्दमय झाले...........

डोळ्यांशी साधताना
संवाद मुक्या प्रीतीचा
शब्दांनाही कळेल कारे
चोरटा भाव अंतरीचा?

तू बोलावे शब्दांतून माझ्या
मी केवळ ओठ व्हावे
तुझ्या ओठांवर थांबताना
श्वासाला शब्द द्यावे..........

मी न माझी आहे आता
शब्दांत तुझ्या साठले
ओठांवर घेता तुला
अंतर श्वासात गोठले..........

शब्द उतरता मनात
उधाण मनास आले
श्वासागणिक श्वासाचे
मी मन झाले..........

तुझ्या शब्दांची आता
मैफल रोज सजते
स्वप्नातही सांग कारे
वेळेचे अंतर मोजते?

हाताच्या रेषांवर जेव्हा
दिलास तू शब्द
रेषांनाही मिळाले आज
जगण्याचे प्रारब्ध!

सांग कधी पुसणार नाही
शब्दांची ही रेषा?
शब्दांनाही देशिल कारे
प्रीतीची ही भाषा?

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २०.०६.२०१० रविवार
वेळ : रात्री १०.००

Wednesday, June 9, 2010

नको दगा शब्दांचा पुन्हा हा........

कसे सांगू सख्या रे
खंत होऊन भेटते
शब्दांच्या धगीत तुझ्या
मीही कारे पेटते?

दिलास दगा ना तू मला
ना मी होते दगाबाज
मनातले शब्द बोलण्या
होता मुका आवाज!

आरोपात पेटलास तूही
माझी झाली राख
सावरले असते जर शब्दांत
असती माझी ओळख!

सरले होते ते दिन सारे
पुसट होत्या आठवणी
घेऊन दगा शब्दांचा
थांबली होती लेखणी!

आलास अचानक नजरेत पुन्हा
पाणावले अस्तित्व माझे
दगा देऊनी आठवांना
का काही ठेवलेस तुझे!

न सहावे शब्द तुझा
का भावनेत मारतोस?
मेले होते शब्दांत तेव्हा
का पुन्हा तारतोस!

घे हवे जर प्राण माझे
वा टाळ संवाद हा
खुळ्या प्रीतीला छळण्याचा
जीवघेणा नाद हा!

थांब आता तूही जरा
बघ शब्दांत मी नाही
तुजसाठी जपलेली लेखणी
ठरली दगाबाज आताही......
नको दगा शब्दांचा पुन्हा हा...........

(स्वरचित) : कु. प्रिती अ. खेडेकर
दिनांक : ०९.०६.२०१० बुधवार
वेळ : सायं. ४.३०