Thursday, March 18, 2010

'संवाद शब्दांचा'

अडकले जे तुझ्यात येऊन
शब्द माझ्या ओठातले
शिकले जाणिवा देण्यास
भाव तुझ्या नात्यातले

संवाद दोन मनांचा
ओळख 'निखळ प्रीतीची'
शब्दांतही येऊन परतली
वाट येण्याच्या परतीची....

नव्या श्वासात जागले
अव्यक्त भाव मनाचे
तुझ्यातूनच भेटले माझे
नाते चार क्षणाचे

दिलेस श्वासात असे तू
थांबले क्षण कंठातूनी
शब्दांनाही जाग आली
मिटलेल्या ओठांतूनी....

दिलीस त्या राती तू
ओळख शब्दांत उरण्याची
आठवांतही ओळख आता
संवाद पुन्हा करण्याची

सांग आता शब्दांनाही
नसे सुटका तुझ्यातूनी
संवाद हा रोजचाच त्यांचा
व्यक्त होईल माझ्यातूनी
संवाद हा शब्दांतूनी..........

(स्वरचित) : कु. प्रिती अ. खेडेकर
दिनांक : १.०३.२०१० सोमवार
वेळ : रात्री २.३०

'सावल्या'

आज माझ्या सावल्यांना
ओळख माझी ना राहिली
सोबतीची वाट आता
एकटे चालून पाहीली

कधी विस्कटले सारे सावरून
कधी माझ्यातून विस्कटले
नव्हते कधीच जे माझे
मागणे मग कुठले?

नकळे कधी सुटला हात
नकळे काय मिळवले?
जे जे मिळाले होऊन माझे
त्यांचे धर्म पाळले!

सांभाळल्या मी चटक्यात
सावल्यांच्या भावना
गर्दीत का मी आज त्यांच्या
ठरलो आहे उणा!

जगतो देह आज काही
घेऊन प्रश्न सावल्यांचा
कसा आवरू विश्वास त्यांचा?
भरवसा ना जिथे आपल्यांचा!

थकली ती पायवाट
सावल्यांची आस खोटी
इथे सावलीही ठरते
अस्तित्वाची चोरटी!

थांबला शोध सावल्यांचा
जगण्यात होती खोट
सरणापाशी आज थांबली
संपणारी वाट!
सावल्यांची वाट!

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
दिनांक १५.०३.२०१० सोमवार
वेळ : रात्री १.१०