Tuesday, January 19, 2010

'मी मूर्त सावळी!'

मी माझीच प्रीती
मी माझीच सावली
प्रकाशमान आत्म्याची
मी मूर्त सावळी!

सावळे असती मेघ
डोळ्यांतील चांदणे सावळे
सावळी असे रात
कान्हाचे रूप सावळे
सावळ्या रूपाचे
अर्थ मी सावळे!

कधी होते सावली ग्रीष्माची
कधी असते अंधारात
कधी दिव्याच्या वातीसम
जळतेही प्रकाशात
सावळ्या त्यागाचे
स्पर्श मी सावळे!

काजळी होऊन बसते मी
अबीर उधळीत येते
विठुच्या सावळ्या अभंगात
सावळे गीत होते
सावळ्या नात्याचे
बंध मी सावळे!

जन्माची काजळाची रेघ
मृत्यूची राख सावळी
पहाटेच्या वेळची पहाट
कातरवेळही मी सावळी!
सावळ्या माझ्या देहाची
'प्रीती' मी सावळी!
मी मूर्त सावळी
जणू मनाची सावली!

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
०४.०१.२०१० रविवार
रात्री १.३०

'माझा नेता'

जन्मला बाई जन्मला
नोट देऊन वोटात आला
गरिबांच्या चिमट्यातून
एक चोर 'नेता' झाला!

निशाणी बनते भाकरी
सत्याचे होते वस्त्रहरण
ताई-अक्का, मारा शिक्का
लबाड आला शरण!

शतरंज बनते जीवन
माणसं होती मोहरे
कान असलेले चेहरे
होती मुक्याने बहीरे!

लोणी चोरणारा टाळूवरचा
जो पाहतो फायदा
आश्वासनाच्या नावाखाली
निभावील का कायदा?

डोळे झाकून येथे
मांजर माझी दूध पिते
पैशाच्या बाजारात अशी
मतीही विकली जाते

वाजवू दे पोटाचा नगारा
'बाबा' तू चिमटेच खा रे!
पाहू दे सुखाचा पाऊस याला
तुझ्या घरात उघडे वारे!

अस्मितेवर चालवितो हा
कुळाची गुंडेगिरी
तुझ्या बघ रे तव्यावर
करपते ती भाकरी!

आरश्यातही पाहतो हा
चेहऱ्यावरचा मुखवटा!
देणाऱ्याच्या देण्यात असतो
घेणाऱ्यांचा तोटा!

जन्म-मृत्यूचाही करतो
बेईमान व्यवहार!
देवाचाही जुगार मांडून
करतो हा व्यापार!

जगतानाही मारतो हा
जगण्याचे कारण
मरतानाही करतो मग
मृत्यूचे राजकारण!

मेला बाई मेला
जन्माला एक घालून...........माझा नेता!

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१९.०१.२०१० मंगळवार
वेळ : रात्री २.५५

Tuesday, January 12, 2010

'सुन्या या मैफिलीत'

(माझ्या मनातल्या गाण्याला काव्यात मी आणले आहे..........सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.............माझा सर्वांत आवडता गाणं................काही चुकल्यास क्षमा असावी!)

सुन्या माझ्या मैफिलीचे
सुने तुझे शब्द आहे
मुक्या त्या हुंदक्याचे
आसूही का स्तब्ध आहे?

कळेना मला गुन्हा माझा
कि माझे प्रारब्ध आहे
विझलेल्या वातीचे का
मेणही आज तप्त आहे?

तुला भेटतील सूर तुझे
माझ्यातूनी अव्यक्त आहे
भारावलेल्या स्वरांसाठी
मन माझे रीक्त आहे

मनातील झरोख्याचे
कवडसे का गुप्त आहे?
मैफिलीतल्या सुनेपणाचे
आज तू निमित्त आहे

कसे हृदय देऊ क्षणांना
भावनाही जिथे सक्त आहे
फरशीवरील थेंबात आज
जखमांचे रक्त आहे

बैठकीतल्या देव्हाऱ्यात
देवाविण का भक्त आहे?
थांबतो ना भक्तीत तोही
हाय! जालीम वक्त आहे!

रोज सजते मैफिल माझी
गाणे माझे लुप्त आहे
आत्मा होऊनही आठवांचा
शब्द आज अतृप्त आहे!
सुन्या या मैफिलीत
सुनेपण फक्त आहे..........................

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१२.०१.२०१० मंगळावर
वेळ : पहाटे ४.००

Monday, January 11, 2010

'आई जन्मली'

आली जवळ घटीका
प्रसूतीच्या असह्य वेदना
देहात जन्मला जन्म
घेऊनी नवचेतना!

नऊ मास जपले मी
बीज होण्या अंकुरीत
श्वासातून जपले श्वास
कुंकवाची मनुप्रीत!
स्वप्न दोघांचे आज
साकारते रचना!

जगले वांझोटी आधी
पाच वर्षांचा संसार
भोगला सासुरवास सारा
नशिबी दाटला अंधार!
कुंकवाच्या धन्यानेच
दिल्या आजवर यातना!

बातमी आली कानी
सजणार गं गोकुळ
नयनांत आस जागली
होती जी व्याकुळ
पाळणा सजवून स्वप्नांचा
जगले मी वचना!

दैवानेच घातला घाव
गर्भ ना उरला
जन्म घेण्याआधीच
मातीत तो पुरला!
वांझोटी आता लेकीची
पोराचीच याचना!

परतून पानझड वटाची
बहरेल पुन्हा एकदा
साहीले चटके आजवर
जन्म फेडन्या शतदा
आजही रीक्त झोळीत
मातृत्वाची वेदना!

पुन्हा आली चाहूल
'पोरगा' आला पोटी
आई जन्मेल आता
नसे ती वांझोटी!
मिळेल आईपण आता
नशिबाची ही योजना!

वेदनांच्या आईपणात
गाईली मनी अंगाई
कवटाळूनी उराशी बाळाला
जन्मली ही 'आई'
सावरुनी जन्म पोराचा
जपल्या साऱ्या भावना!
देहात जन्मला जन्म
घेऊनी नवचेतना!
लेकीची वेदना!
पोराची याचना!
नशिबाची योजना.......................

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
११.०१.२०१० सोमवार
वेळ : रात्री १.३५

'यौवनाची रात'

स्वप्नात रंगले मी
घेऊन स्वप्न सारे
यौवनाचा बहर हा
छळती खट्याळ वारे!

बसले होते एकदा
तळ्याकाठी एकटे
मुक्त झाले माझ्यातले
काही स्पर्श चोरटे

रातीचा चंद्र अन
चांदण्या पाण्यातूनी
हरपती भान काजवे
अनिलच्या गाण्यातूनी

लाजली सळसळ पानांची
स्पर्शात ओल्या न्हाउनी
फुलांनाही आली कैफ
यौवनाचे भार साहूनी

कुणी बाई वेधले हे
रूप श्यामल चेहऱ्याचे
माझ्यातूनि लाजले स्पर्श
यौवनाच्या नखरयाचे!

नयन त्याचे जादूगार
नजरेत मला ओढले
श्वासात ओढूनी मला
अधराशी नाते जोडले

विसरले भान सारे
यौवनाच्या राती
घेतो चंद्रही चांदण्यात
मधुमीलनाची प्रीती!

यौवनात बहरले
स्वप्न चंद्राचे घेऊन
तळ्याकाठी बसते तेव्हाही
पाण्यात चांदणे देऊन!
यौवनाची ती रात...............

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१०.०१.२०१० रविवार
वेळ : रात्री १.३०

Friday, January 8, 2010

'घायाळ प्रीती'

होता दिवस रोजचाच तो
खेळत होते खेळ
वर्ष सोळा नात्याचा
घालीत मनाशी मेळ!

अचानक ओलांडता रस्ता
बाईक त्याची अडली
आजवर चोरलेली नजर
त्याला जाऊन भिडली

उमलली कळी आज
घेउनी स्वप्न मीठीचे
प्रीतीच्या ओढीत आले
गीत नाजूक ओठीचे!

मैत्री आली ओढीत प्रेमाच्या
सांगू कसे कळत नव्हते
सांगावं फोनवर सारं
मनातून जे अव्यक्त होते

सांगणार होते सारे माझे
त्यानेच आधी सांगितले
प्रेयसीचा फोटो देऊन
विचार त्यावर मागितले!

का कुणी ऐकले नाही
हुंदके घायाळ मनाचे
जखमांनाही सावरते का
नाते चार क्षणाचे!

भेटलो अनेकदा असेच
सांगायचा बरेच काही
व्यक्त होताना माझे
म्हणे, "आता वेळ नाही"

धावले घरी तशीच
पत्र लिहिले, "जाते मी"
कापून 'नस' आयुष्याची
"रक्तातून बोलते मी"

केले वार ब्लेडने
विचार आला, आईचं काय?
जिने वाढविले दुध पाजून
कोसळेल गं ती माय!

विचार बदलला क्षणात
हाताचे पुसले रक्त
बांधून पट्टी जखमांवर
जगले तिच्यासाठी फक्त!

पुन्हा वाटलं, सांगावं त्याला
अजूनही जखमा ओल्या
हरवलेल्या वाटेवरी
शोधते तुझ्या सावल्या!

शब्द आजही अडले
वाटले समजून घेईल
लोटलेल्या सात वर्षांची
परतफेड तो देईल!

काळ बदलला, तोही बदलला
बदलली त्याची नाती
जाणली नाती खोट्याची
घायाळ ही प्रीती!

हुंदका कसा देऊ आज?
अंतरी अश्रू गोठले
प्रीतीच्या व्यथेने
काळजात वादळ उठले!

पुरे झाले चालणे आता
होती वाट दगाबाज
नात्यांच्या घुमतो कानात
वेदनांचा आवाज!

थांबला आवाज आता
नव्या अर्थात भेटते
रोजच्या नव्या दिसासाठी
नव्या रातीतून उठते.............
होता दिवस रोजचाच.............

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
०९.०१.२०१०

Thursday, January 7, 2010

'देवाचे देवपण'

देव या नामातच सारे आहे
रूप मात्र देवाचे भिन्न आहे

एक देव तो पैसा देतो
दुजा आपलीच झोळी भरतो
एक देव गुलाम करतो
आत्म्याला लाथाडून पुढे जातो
गुलामीचेही 'पैसा' हे कारण आहे
देवाचे यातच देवपण आहे!

एका देवीचे नाम काय वर्णावे?
वासनापूर्तीसाठी तिच्या घरी जावे
एक देवीचे नाम सतत घ्यावे
अग्नीत जाळता 'सती' म्हणून पूजावे
जळण्याचे 'अबला' हे कारण आहे
अन्याय सहन करण्यातच देवीचे देवपण आहे!

एका देवाची कीर्ती काय सांगू?
'नेता' म्हणवून लुबाडता आणि काय मागू?
एका देवाला 'नट' म्हणून पूजले
अनुकरणाच्या प्रसादे प्राण गेले
नेत्याला पुजण्याचे 'लाचारी' हे कारण आहे
गुंडांच्या आधारात देवाचे संरक्षण आहे!

एक देव महा क्रूर, निष्पापींचे करितो खून
गुंड देवाला करितो नमन वाकून
एक खाकी वर्दीतला देव लाच घेतो
विकत घेताना माणूस, आत्माही विकला जातो
देवापुढे वाकण्याचे 'भय' हे कारण आहे
अत्याचार करण्यात देवाचे गुंडेपण आहे!

एक देव राजा, 'भावना' म्हणतात
शस्त्र कुविचारांचे घेऊन 'बंधनात' गणतात
एका देवापुढे सारेच हरतात
'काळ' येऊ लागला कि जागे होतात
बंधनात जगण्याचे 'निद्रा' हे कारण आहे
म्हणूनच देवाचे देवपण टिकून आहे!
सावध व्हा!

II देव कहाणी संपूर्णम II

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१६.७.२००१ सोमवार
वेळ : सकाळी ११.२५

'ते मन'

मनाच्या एका कोपऱ्यात
एक दुजे मन जागे आहे
ते कुणाचे? ठाऊक नाही

हे मन म्हणतं "पाप कर"
ते मन म्हणतं "थांब क्षणाचा विचार कर"
ऐकावे कुणाचे? ठाऊक नाही

स्वार्थ साधताना मन म्हणतं "सत्याचा खून कर"
ते मन म्हणतं "सारासार विचार कर"
मानावे कुणाचे? ठाऊक नाही

अभिमानाचा बलात्कार होता मन म्हणतं "पुढे जा"
ते मन म्हणतं "थांब चैतन्याचा विचार कर"
खरे कुणाचे? ठाऊक नाही

नैराश्याचे भीकपात्र आल्यावर मन म्हणतं "वाईटपणा घे"
ते मन म्हणतं "जाऊ दे चांगला विचार घे"
कसे वागू? ठाऊक नाही

माणुसकी स्मशानात पुरता मन म्हणतं "आणखी खड्डे खण"
ते मन म्हणतं "आपल्याचसाठी असणार, विचार कर"
कोणत्या मनाचं ऐकू? ठाऊक नाही................
मनाचे कोडे उलगडत नाही...............

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
११.०७.२००१ बुधवार
वेळ : रात्री ११.५५

Tuesday, January 5, 2010

'ओल्या आठवांच्या वाटा'

खुणावती कोरड्या मनाला
ओल्या आठवांच्या वाटा
होई भरलेल्या जखमांचा
साक्ष रुतलेला काटा!

उंबऱ्यापाशी थिजतात
होऊनी खंत वाटा
लुटारू आपल्या माणसांत
बनतो मित्र चोरटा
माझ्या ओल्या आठवांना
आजही खटकते काही
हरवताही भेटताना त्याचे
पुन्हा भटकते काही...............

सागरात बुडतात
होऊनी खंत वाटा
सोबती ज्या वाळूच्या
दगा देती लाटा
ओल्या त्या आठवांच्या
खुणा हरवतात काही
नव्या पाउलखुणा उमटुनी
पुन्हा पुसतात काही.............

चांदण्यात संपतात
होऊनी खंत वाटा
चंद्रास त्यात धरण्याचा
हाच एक तोटा
आठवांच्या त्या चंद्रात
चांदण्या भेटतात काही
सावरुनी दगा चंद्राचा
पुन्हा पेटतात काही..............

वाटेतच हरवतात
होऊनी खंत वाटा
आपल्यातल्या आठवांचा
धर्म ठरतो खोटा!
ओल्या त्या आठवांत
मन ओलावते काही
गतकाळच्या ध्वसांत
काही हेलावते आताही.............
नको त्या ओल्या वाटा...................

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
०६.०१.२०१० मंगळवार
वेळ : रात्री २.४५

'ही नवी आखणी'

धुंद या प्रीतीची ही नवी आखणी
अर्थ होऊनी दे गीत हे मन्मनी

शब्दाविना न काही
अर्थ असे जगण्याला
अर्थ होऊनी मग
शब्द दे भावनेला
घे मना स्पर्श तू होऊनी साजणी.............

पंखाविना नसे काही
जीवन या पक्ष्याला
घे उंच भरारी
अर्थ असे उडण्याला
का नसे अंतरी भावाची बोलणी................

पाकळीसाठी जीवन हे
फुलण्याचे रहस्य माझे
काट्यासोबत जगताना
मरूनही जगणे माझे
असू दे त्या मनी पापाची टोचणी....................

स्पर्शाविना धर्म कसला
अश्रूंच्या वाहण्याचा
ओलाव्यातून सुकण्याचा
अर्थ हा राहण्याचा
होऊ दे पुन्हा ओली ही पापणी....................

किनाऱ्यावर लाटेचा
बोलका अर्थ असे
येण्याचा परामर्श
जाण्याचा परमार्थ असे
जाते आता परतुनी होईन आठवणी...................
धुंद या प्रीतीची ही नवी आखणी.....................

(स्वरचित) :- प्रिती अ. खेडेकर
०५.०९.२००२ गुरुवार
वेळ : सकाळी ९.२५

'फांदीवरचे झुले'

ओल्या या जाणीवा
भाव असे ओले
नात्याच्या निर्मितीचे
फांदीवरचे झुले!

श्वास नवा घेण्याचा
विचार असे नव्याचा
नव्या स्पर्शासाठी
छंद थेंब झेलण्याचा!

रानोवनी फिरले
ओसाड मागेच सरले
नव्या किरणांचे
खेळ आज उरले

फांदी सोबत आली
बांधला मी झुला
नि खुळ्या प्रीतीचा
खुळा विरंगुळा!

नवे नव्याचे असे
ओल्या मनाच्या स्पर्शात
भावही झुलला
फांदीवरच्या झुल्यात!

ओलावल्या अशा जाणीवा
भाव आले ओले
नात्याच्या निर्मितीचे
बांधले नवे झुले!
फांदीवरचे झुले!

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१४.०१.२००४ बुधवार
वेळ : सायं : ७.१५

Sunday, January 3, 2010

'निखारे'

चुकले एकदाच नात्यात
नसे का क्षमा त्याला?
का देतोस मला
तू 'वीषाचा प्याला'!

आणतोस जेव्हा द्वेषाला
प्रीतीच्या वाऱ्यात
ऋतूच्या गारव्यातही
पेटते मी निखाऱ्यात!

वचने नव्हती तुझी कधीच
का प्रेम स्वीकारलं माझं?
मीठीत आणून जगण्याला
का मारतोस जे होतं तुझं?

ऐकून जगाचे सांगणे
जरी सोडला विश्वास
का मग आसवांत असते
तू पुसण्याची आस!

ठाऊक मी नाही तुझी
संपले आता सारे
का जाळतात मग आताही
तुझे पेटते निखारे!

नको जन्माचे नाते मला
दे क्षण प्रेमाचे थोडे
ओलावा दे श्वासांना
आजही ते कोरडे!

थांबेन मीही तेव्हा
म्हणशील थांबू आता
नाही लादणार तुझ्यावरी
कठोर वचनांची प्रथा!

घे गारवा नात्यात
मी निखाऱ्यात पेटता
ओलावल्या जखमांना
घाल फुंकर आता!
निखारे विझवून..............

(स्वरचित) :- प्रिती अ. खेडेकर
०४.०१.२०१० सोमवार
रात्री : - १.५०

'सुनामी'

पडली गाठ जन्माची
थाटला संसार सुखाचा
किनाऱ्याच्या घरट्यात
विसर पडला दु:खाचा

वर्षे लोटली दोन-चार
लोटले सारे ताप
जन्मता पिल्ले दोन
जन्मला हा बाप!

नाईलाज होतो केह्वा
पोटासाठी दूर जाणे
आपल्यांच्या वाटेवरी
परतूनही न येणे

दूर जरी असलो
हृदय असते उशाशी
भरतो पोट आपल्यांचे
राहीलो जरी उपाशी

आला धावून काळ अचानक
वादळवाऱ्यांच्या दिसांना
'सुनामी' लाटांनी गिळले
माझ्याच माणसांना!

अश्रू होते हृदयात
डोळे मात्र कोरडे
बहरलेल्या नंदनवनी का
प्रेतांचे आज सडे!

अजूनही हाक ऐकतो
"वाचवा मला वाचवा"
त्यांच्याच प्रेताशेजारी
पेटत असेल एक दिवा!

त्राण अंगी नाही आता
आपल्याच प्रेतांचा शोध?
लाचारीच्या श्वासांवर
जगतो आता क्रोध!

संपल्या त्या आठवणी
नव्हता संसार माझा
आपल्यांच्याच अग्नीत
मीच आहे वजा!

ठरवलं आताही जगेन
शोध माझ्या मरणाचा
'सुनामी' येऊन माझ्यावरी
अंतर मिटवेल सरणाचा!
कधी येईल 'सुनामी?'

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
०३.०१.२०१० रविवार
वेळ : रात्री २.३०

Saturday, January 2, 2010

पुरे झाली हि शब्दांची खेळी....................

स्वप्नांचा भास देऊन
स्वप्न तू पाहशील
मलाच सोडून स्वप्नात
नवे जग शोधशील

होसी रातीचे चांदणे तू
माझे आभाळच दाटले
पावसात भिजू कसे?
जग आभाळात फाटले

ध्येय तुझेच ते होते
मी होते प्रश्नांत!
मी वाचली जी आजवर
तुझ्या डोळ्यांची खंत!

स्वप्न पूर्ण करू पाहसी
जे माझे नव्हते कधी
स्वप्नांनी घेतली माझ्या
तुझ्यातून समाधी!

तरी तू म्हणतोस प्रेम तयाला
कारे फसवतोस असे?
विश्वास गमावलेल्या नात्यावरी
नको फिरवूस मोरपिसे!

पुरे झाली हि शब्दांची खेळी....................

(स्वरचित) : - प्रिती खेडेकर
०२.०१.२०१० शनिवार
वेळ : दुपारी ३.१४

Friday, January 1, 2010

'पोट'

गावाकडे जन्म जगला
गरीब आम्ही भाबडे
मुंबईच्या स्वप्नांत
जगती गहाण वाडे!

ऐकून हाक पोटाची
मुंबई जीवाची गाठली
माणसं शोधणाऱ्या मुंबईची
माणुसकीही का आटली?

पोटासाठीच नसता जागा
झोपडीसाठी मिळेल कशी?
जमवून मग वितभर जागा
बांधलं खोपट डोंगरापाशी

ऋतू अनेक लोटली
खोपटही माझं जगलं
भरवश्यावर पोटाच्या
फाटक्यातही भागलं

घात घडला रातीला
आभाळ फाटून आलं
डोंगराच्या दरडीत
खोपटच फुटून गेलं!

ज्यानेच दिला आसरा
तोच घात झाला
राख करून स्वप्नांची
पोटच घेऊन गेला

उठून पाहिले एकदा
पायथ्याशी पोट होतं
लाल-काळ्या ढिगाऱ्यात
पोराचं धड नव्हतं

शोधू किती ढिगाऱ्यात?
भरावयाचच पोट मेलं
नको पोटाची आस माझ्या
धडही ढिगाऱ्यात नेलं!
कायमचं........................

(स्वरचित) : प्रिती अशोक खेडेकर
१.१.२०१० शुक्रवार
वेळ : सकाळी ६.३०

(काल घाटकोपर ला बस ने जात असता डोंगरावरच्या घराकडे सहज नजर गेली! आणि त्यांचे जीवन अनुभवत मीही ती अशी जीवनात मांडली!)