Sunday, January 3, 2010

'सुनामी'

पडली गाठ जन्माची
थाटला संसार सुखाचा
किनाऱ्याच्या घरट्यात
विसर पडला दु:खाचा

वर्षे लोटली दोन-चार
लोटले सारे ताप
जन्मता पिल्ले दोन
जन्मला हा बाप!

नाईलाज होतो केह्वा
पोटासाठी दूर जाणे
आपल्यांच्या वाटेवरी
परतूनही न येणे

दूर जरी असलो
हृदय असते उशाशी
भरतो पोट आपल्यांचे
राहीलो जरी उपाशी

आला धावून काळ अचानक
वादळवाऱ्यांच्या दिसांना
'सुनामी' लाटांनी गिळले
माझ्याच माणसांना!

अश्रू होते हृदयात
डोळे मात्र कोरडे
बहरलेल्या नंदनवनी का
प्रेतांचे आज सडे!

अजूनही हाक ऐकतो
"वाचवा मला वाचवा"
त्यांच्याच प्रेताशेजारी
पेटत असेल एक दिवा!

त्राण अंगी नाही आता
आपल्याच प्रेतांचा शोध?
लाचारीच्या श्वासांवर
जगतो आता क्रोध!

संपल्या त्या आठवणी
नव्हता संसार माझा
आपल्यांच्याच अग्नीत
मीच आहे वजा!

ठरवलं आताही जगेन
शोध माझ्या मरणाचा
'सुनामी' येऊन माझ्यावरी
अंतर मिटवेल सरणाचा!
कधी येईल 'सुनामी?'

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
०३.०१.२०१० रविवार
वेळ : रात्री २.३०

No comments:

Post a Comment