Tuesday, January 19, 2010

'माझा नेता'

जन्मला बाई जन्मला
नोट देऊन वोटात आला
गरिबांच्या चिमट्यातून
एक चोर 'नेता' झाला!

निशाणी बनते भाकरी
सत्याचे होते वस्त्रहरण
ताई-अक्का, मारा शिक्का
लबाड आला शरण!

शतरंज बनते जीवन
माणसं होती मोहरे
कान असलेले चेहरे
होती मुक्याने बहीरे!

लोणी चोरणारा टाळूवरचा
जो पाहतो फायदा
आश्वासनाच्या नावाखाली
निभावील का कायदा?

डोळे झाकून येथे
मांजर माझी दूध पिते
पैशाच्या बाजारात अशी
मतीही विकली जाते

वाजवू दे पोटाचा नगारा
'बाबा' तू चिमटेच खा रे!
पाहू दे सुखाचा पाऊस याला
तुझ्या घरात उघडे वारे!

अस्मितेवर चालवितो हा
कुळाची गुंडेगिरी
तुझ्या बघ रे तव्यावर
करपते ती भाकरी!

आरश्यातही पाहतो हा
चेहऱ्यावरचा मुखवटा!
देणाऱ्याच्या देण्यात असतो
घेणाऱ्यांचा तोटा!

जन्म-मृत्यूचाही करतो
बेईमान व्यवहार!
देवाचाही जुगार मांडून
करतो हा व्यापार!

जगतानाही मारतो हा
जगण्याचे कारण
मरतानाही करतो मग
मृत्यूचे राजकारण!

मेला बाई मेला
जन्माला एक घालून...........माझा नेता!

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१९.०१.२०१० मंगळवार
वेळ : रात्री २.५५

No comments:

Post a Comment