Monday, January 11, 2010

'आई जन्मली'

आली जवळ घटीका
प्रसूतीच्या असह्य वेदना
देहात जन्मला जन्म
घेऊनी नवचेतना!

नऊ मास जपले मी
बीज होण्या अंकुरीत
श्वासातून जपले श्वास
कुंकवाची मनुप्रीत!
स्वप्न दोघांचे आज
साकारते रचना!

जगले वांझोटी आधी
पाच वर्षांचा संसार
भोगला सासुरवास सारा
नशिबी दाटला अंधार!
कुंकवाच्या धन्यानेच
दिल्या आजवर यातना!

बातमी आली कानी
सजणार गं गोकुळ
नयनांत आस जागली
होती जी व्याकुळ
पाळणा सजवून स्वप्नांचा
जगले मी वचना!

दैवानेच घातला घाव
गर्भ ना उरला
जन्म घेण्याआधीच
मातीत तो पुरला!
वांझोटी आता लेकीची
पोराचीच याचना!

परतून पानझड वटाची
बहरेल पुन्हा एकदा
साहीले चटके आजवर
जन्म फेडन्या शतदा
आजही रीक्त झोळीत
मातृत्वाची वेदना!

पुन्हा आली चाहूल
'पोरगा' आला पोटी
आई जन्मेल आता
नसे ती वांझोटी!
मिळेल आईपण आता
नशिबाची ही योजना!

वेदनांच्या आईपणात
गाईली मनी अंगाई
कवटाळूनी उराशी बाळाला
जन्मली ही 'आई'
सावरुनी जन्म पोराचा
जपल्या साऱ्या भावना!
देहात जन्मला जन्म
घेऊनी नवचेतना!
लेकीची वेदना!
पोराची याचना!
नशिबाची योजना.......................

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
११.०१.२०१० सोमवार
वेळ : रात्री १.३५

1 comment: