Friday, January 1, 2010

'पोट'

गावाकडे जन्म जगला
गरीब आम्ही भाबडे
मुंबईच्या स्वप्नांत
जगती गहाण वाडे!

ऐकून हाक पोटाची
मुंबई जीवाची गाठली
माणसं शोधणाऱ्या मुंबईची
माणुसकीही का आटली?

पोटासाठीच नसता जागा
झोपडीसाठी मिळेल कशी?
जमवून मग वितभर जागा
बांधलं खोपट डोंगरापाशी

ऋतू अनेक लोटली
खोपटही माझं जगलं
भरवश्यावर पोटाच्या
फाटक्यातही भागलं

घात घडला रातीला
आभाळ फाटून आलं
डोंगराच्या दरडीत
खोपटच फुटून गेलं!

ज्यानेच दिला आसरा
तोच घात झाला
राख करून स्वप्नांची
पोटच घेऊन गेला

उठून पाहिले एकदा
पायथ्याशी पोट होतं
लाल-काळ्या ढिगाऱ्यात
पोराचं धड नव्हतं

शोधू किती ढिगाऱ्यात?
भरावयाचच पोट मेलं
नको पोटाची आस माझ्या
धडही ढिगाऱ्यात नेलं!
कायमचं........................

(स्वरचित) : प्रिती अशोक खेडेकर
१.१.२०१० शुक्रवार
वेळ : सकाळी ६.३०

(काल घाटकोपर ला बस ने जात असता डोंगरावरच्या घराकडे सहज नजर गेली! आणि त्यांचे जीवन अनुभवत मीही ती अशी जीवनात मांडली!)

No comments:

Post a Comment