Friday, January 8, 2010

'घायाळ प्रीती'

होता दिवस रोजचाच तो
खेळत होते खेळ
वर्ष सोळा नात्याचा
घालीत मनाशी मेळ!

अचानक ओलांडता रस्ता
बाईक त्याची अडली
आजवर चोरलेली नजर
त्याला जाऊन भिडली

उमलली कळी आज
घेउनी स्वप्न मीठीचे
प्रीतीच्या ओढीत आले
गीत नाजूक ओठीचे!

मैत्री आली ओढीत प्रेमाच्या
सांगू कसे कळत नव्हते
सांगावं फोनवर सारं
मनातून जे अव्यक्त होते

सांगणार होते सारे माझे
त्यानेच आधी सांगितले
प्रेयसीचा फोटो देऊन
विचार त्यावर मागितले!

का कुणी ऐकले नाही
हुंदके घायाळ मनाचे
जखमांनाही सावरते का
नाते चार क्षणाचे!

भेटलो अनेकदा असेच
सांगायचा बरेच काही
व्यक्त होताना माझे
म्हणे, "आता वेळ नाही"

धावले घरी तशीच
पत्र लिहिले, "जाते मी"
कापून 'नस' आयुष्याची
"रक्तातून बोलते मी"

केले वार ब्लेडने
विचार आला, आईचं काय?
जिने वाढविले दुध पाजून
कोसळेल गं ती माय!

विचार बदलला क्षणात
हाताचे पुसले रक्त
बांधून पट्टी जखमांवर
जगले तिच्यासाठी फक्त!

पुन्हा वाटलं, सांगावं त्याला
अजूनही जखमा ओल्या
हरवलेल्या वाटेवरी
शोधते तुझ्या सावल्या!

शब्द आजही अडले
वाटले समजून घेईल
लोटलेल्या सात वर्षांची
परतफेड तो देईल!

काळ बदलला, तोही बदलला
बदलली त्याची नाती
जाणली नाती खोट्याची
घायाळ ही प्रीती!

हुंदका कसा देऊ आज?
अंतरी अश्रू गोठले
प्रीतीच्या व्यथेने
काळजात वादळ उठले!

पुरे झाले चालणे आता
होती वाट दगाबाज
नात्यांच्या घुमतो कानात
वेदनांचा आवाज!

थांबला आवाज आता
नव्या अर्थात भेटते
रोजच्या नव्या दिसासाठी
नव्या रातीतून उठते.............
होता दिवस रोजचाच.............

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
०९.०१.२०१०

No comments:

Post a Comment