Monday, January 11, 2010

'यौवनाची रात'

स्वप्नात रंगले मी
घेऊन स्वप्न सारे
यौवनाचा बहर हा
छळती खट्याळ वारे!

बसले होते एकदा
तळ्याकाठी एकटे
मुक्त झाले माझ्यातले
काही स्पर्श चोरटे

रातीचा चंद्र अन
चांदण्या पाण्यातूनी
हरपती भान काजवे
अनिलच्या गाण्यातूनी

लाजली सळसळ पानांची
स्पर्शात ओल्या न्हाउनी
फुलांनाही आली कैफ
यौवनाचे भार साहूनी

कुणी बाई वेधले हे
रूप श्यामल चेहऱ्याचे
माझ्यातूनि लाजले स्पर्श
यौवनाच्या नखरयाचे!

नयन त्याचे जादूगार
नजरेत मला ओढले
श्वासात ओढूनी मला
अधराशी नाते जोडले

विसरले भान सारे
यौवनाच्या राती
घेतो चंद्रही चांदण्यात
मधुमीलनाची प्रीती!

यौवनात बहरले
स्वप्न चंद्राचे घेऊन
तळ्याकाठी बसते तेव्हाही
पाण्यात चांदणे देऊन!
यौवनाची ती रात...............

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१०.०१.२०१० रविवार
वेळ : रात्री १.३०

2 comments: