Thursday, January 7, 2010

'देवाचे देवपण'

देव या नामातच सारे आहे
रूप मात्र देवाचे भिन्न आहे

एक देव तो पैसा देतो
दुजा आपलीच झोळी भरतो
एक देव गुलाम करतो
आत्म्याला लाथाडून पुढे जातो
गुलामीचेही 'पैसा' हे कारण आहे
देवाचे यातच देवपण आहे!

एका देवीचे नाम काय वर्णावे?
वासनापूर्तीसाठी तिच्या घरी जावे
एक देवीचे नाम सतत घ्यावे
अग्नीत जाळता 'सती' म्हणून पूजावे
जळण्याचे 'अबला' हे कारण आहे
अन्याय सहन करण्यातच देवीचे देवपण आहे!

एका देवाची कीर्ती काय सांगू?
'नेता' म्हणवून लुबाडता आणि काय मागू?
एका देवाला 'नट' म्हणून पूजले
अनुकरणाच्या प्रसादे प्राण गेले
नेत्याला पुजण्याचे 'लाचारी' हे कारण आहे
गुंडांच्या आधारात देवाचे संरक्षण आहे!

एक देव महा क्रूर, निष्पापींचे करितो खून
गुंड देवाला करितो नमन वाकून
एक खाकी वर्दीतला देव लाच घेतो
विकत घेताना माणूस, आत्माही विकला जातो
देवापुढे वाकण्याचे 'भय' हे कारण आहे
अत्याचार करण्यात देवाचे गुंडेपण आहे!

एक देव राजा, 'भावना' म्हणतात
शस्त्र कुविचारांचे घेऊन 'बंधनात' गणतात
एका देवापुढे सारेच हरतात
'काळ' येऊ लागला कि जागे होतात
बंधनात जगण्याचे 'निद्रा' हे कारण आहे
म्हणूनच देवाचे देवपण टिकून आहे!
सावध व्हा!

II देव कहाणी संपूर्णम II

(स्वरचित) : प्रिती अ. खेडेकर
१६.७.२००१ सोमवार
वेळ : सकाळी ११.२५

No comments:

Post a Comment