Tuesday, June 22, 2010

'शब्द'

क्षण माझे दुरावताना
तुझ्यापाशी आले
शब्द घेऊन ओंजळीत
शब्दमय झाले...........

डोळ्यांशी साधताना
संवाद मुक्या प्रीतीचा
शब्दांनाही कळेल कारे
चोरटा भाव अंतरीचा?

तू बोलावे शब्दांतून माझ्या
मी केवळ ओठ व्हावे
तुझ्या ओठांवर थांबताना
श्वासाला शब्द द्यावे..........

मी न माझी आहे आता
शब्दांत तुझ्या साठले
ओठांवर घेता तुला
अंतर श्वासात गोठले..........

शब्द उतरता मनात
उधाण मनास आले
श्वासागणिक श्वासाचे
मी मन झाले..........

तुझ्या शब्दांची आता
मैफल रोज सजते
स्वप्नातही सांग कारे
वेळेचे अंतर मोजते?

हाताच्या रेषांवर जेव्हा
दिलास तू शब्द
रेषांनाही मिळाले आज
जगण्याचे प्रारब्ध!

सांग कधी पुसणार नाही
शब्दांची ही रेषा?
शब्दांनाही देशिल कारे
प्रीतीची ही भाषा?

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २०.०६.२०१० रविवार
वेळ : रात्री १०.००

No comments:

Post a Comment