Thursday, June 24, 2010

'अंतर'

मला कळतंय मी चुकले
तुझ्या ओढीत असते ना......
तू नसता क्षणात माझ्या
आठवणीत जाऊन बसते ना......

अंतर आहे वयात
नात्यात अंतर देऊ नकोस
भेट रोजची शक्य नाही
आठवणीतून जाऊ नकोस
कळतंय तरी आठवणीत
तुला आणून फसते ना........

अंतर आहे शब्दांत
अर्थात अंतर देऊ नकोस
रोजचा संवाद शक्य नाही
विचार टाळण्या येऊ नकोस
कळतंय तरी विचारात
तुलाच मी त्रासते ना.........

अंतर आहे वेळेत
क्षणात अंतर देऊ नकोस
क्षण जपणे शक्य नाही
खंत वेळेत घेऊ नकोस
कळतंय तरी सरल्या क्षणात
तुझीच मी असते ना..........

अंतर आहे प्रीतीत
मनात अंतर देऊ नकोस
प्रीत बोलणे शक्य नाही
बहाणा मात्र होऊ नकोस
कळतंय तरी बहाण्यात
प्रीत होऊन मी असते ना.........

अंतर आहे श्वासात
ओठांत अंतर देऊ नकोस
स्पर्श देणे शक्य नाही
स्वप्नात काही घेऊ नकोस
कळतंय तरी स्वप्नात
तुझी होताना दिसते ना........

अंतर आहे दोषात
घेण्यात अंतर देऊ नकोस
समजून घेणे शक्य नाही
जगाचे दोष घेऊ नकोस
कळतंय तरी दोषात
तुझेच जग मी असते ना.........

अंतर आहे कळण्यात
जाणीवेत अंतर देऊ नकोस
साथ देणे शक्य नाही
एकांती तरी ठेऊ नकोस
कळतंय तरी अंतरात
ओढ जीवाला भासते ना.........
अंतरात मीच असते ना.........

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २४.०६.२०१० गुरुवार
वेळ : सकाळी ८.००

4 comments: