Monday, June 28, 2010

'घे हवे जे तुझ्यासाठी'

रात होऊन चांदणी, चंद्रात पेटते आग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

बघ माझी रात दिवाणी
तुझ्यासाठी थांबली
चंद्राची नशा पाहून
आणि काही लांबली
इथेच आजवरी, स्वप्नात येऊन जाग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

मिटल्या डोळ्यांत स्वप्न
स्पर्शात येता येतात
ओठावरी थांबून राती
तुला तुझे देतात
इथेच आजवरी, माझा होऊन वाग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

कुठली ही जादूगारी
कुठली नशा ही
चांदण्यांना खुणावते
चांदवेडी भाषा ही
इथेच आजवरी, दे रातीचा राग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

सांग त्या श्वासांनाही
सावर तुझे तुला
आवर घालू कसा आता?
कळेना माझेच मला
इथेच आजवरी, श्वास घेण्या लाग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

कसा हा खुळावला
क्षण माझा चोरटा
जपतो सारे आठवांत
राती झुरतो एकटा
इथेच आजवरी, क्षणांना साथ माग रे
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
दिनांक : २७.०६.२०१० रविवार
वेळ : रात्री १.४८

(टीप : चंद्रात पेटते आग रे ..........त्याला ओढ आहे रातीची असा म्हणायचं आहे इथे!
घे हवे जे तुझ्यासाठी, तुझे देऊन माग रे.........इथे क्षणाची देवाण-घेवाण व्हावी असं सांगत आहे! )

No comments:

Post a Comment