Tuesday, December 8, 2009

'गाऊ कशी अंगाई?'

फुटक्या या संसारात
लाचार तुझी आई
कसे पाजू दूध? बाळा,
गाऊ कशी अंगाई?

बाप तुझा दरिद्री
दारू रोज ढोसतो
लाथा-बुक्क्यांचा माराने
मला पोसतो

झोपडी नाही बाळा
मग छप्पर कसे दिसेल?
अंगणात निजवता तुला
छप्पर तेथेच असेल........

अंगावरी नाही कापड
झोळी कशी बांधू?
भोकं पडलेल्या पदराने
वारा कसा घालू?

पोटासाठी नाही भाकर
दूधही आटले
तुझ्या जन्मासाठी
ऋण थोडेच फेडले!

सांग बाळ माझ्या
कोण दीनांचा नाथ?
आई-बाप असूनही
का तू अनाथ?

तुझ्या आसवांचे कष्ट
माझे हातही लाचार
म्हणूनच दुधावरही तुझा हक्क
अर्ध्या पोटावर!

मला ठाउक रे बाळा
अजूनही तू भूका
माझ्या अंगाईसाठी
अर्ध्या पोटावरी जागा!

या फाटक्या संसारात
बाळ गातो - आई-आई
दूध न देऊ शकली
तुझी लाचार आई!
सांग माझ्या बाळा
गाऊ कशी अंगाई?
गाऊ कशी अंगाई?

स्वरचित : कु. प्रिती अशोक खेडेकर
दिनांक : २३.१२.२००३ वेळ : ७.५० वार - मंगळवार

विभाग - मुक्त विभाग
विषय : - दारिद्र्य, स्त्री अत्याचार, उपासमार, व्यसन, लाचारी, सत्य - जीवनाचे!

No comments:

Post a Comment