Tuesday, December 8, 2009

'भाकरी'

भाकरीची किमया न्यारी
कधी उरते कधी संपते
कधी पोटाच्या अर्थात
'भूक' म्हणून उरते!

बाळाच्या लाळेतली भाकरी
मायेचा घासही देते
कधी प्रेमभावनेत अडकून
भाकरी पूर्ण मिळते!

संतांच्या दानाची भाकरी
व्रताच्या मांगल्यात येते
कधी पुण्याच्या लोभापोटी
भाकरी अर्धीच उरते!

भाकरीसाठी होते चोरी
आपल्यांचा घात करते
कधी कुत्र्याच्या पुढ्यातली
भाकरी उष्ठी मिळते!

नोकरीसाठी असते भाकरी
कधी भीक म्हणून उरते
कधी गुलामीच्या नावाखाली
भाकरी तव्यावर जळते!

नेत्याच्या तोंडाची भाकरी
वेशेच्या आत्म्यात दिसते
कधी लाचारीच्या जगण्यात
भाकरी शिळी मिळते!

जन्माच्या बारश्याची भाकरी
मृत्यूचे श्राद्ध घालते
कधी जन्म - मृत्यूमध्ये
भाकरी जन्म घेते!

अशी भाकरी जेह्वा
पोटाला चिमटे काढते
माझ्या अर्ध्या पोटाची
कहाणी नेहमीच सांगते...................

स्वरचित : - कु. प्रिती अशोक खेडेकर
दिनांक :- २३.०९.२००९ वेळ :- रात्री १.00
विषय : उपासमार, लाचारी, बेकारी, भ्रष्टाचार, गुलामी, जीवनाचे सत्य!

1 comment:

  1. Kharach khup sunder aahe,
    manala ekdam dhakka denari aahe,
    khup chaan aahe, mastchhh......

    ReplyDelete