Tuesday, December 8, 2009

' माझा प्रवास'

प्रवास केला मी या वळणावर
आज तो विसावला जरासा
पडतो, उठतो, क्षणभर चालतो
नक्की हा प्रवास कसा?

कुणाच्या घरी कुण्या नावाने
जन्म इतुका झाला
लेक लाडकी होती
धर्म परका झाला
वार आसवांचा होताही
प्रवास चालू होता...............

सतीच्या रूपाने जन्म झाला
ज्वाळांचा हक्क मोठा
चार बाजूंच्या बंदिशाळेत
भरला रक्ताचा साठा!
वेदना रक्ताच्या होताही
प्रवास चालू होता...............

समाज नावाच्या सैतानाने
घेतला अब्रूवरी सूड आता
प्रपंचाच्या भाराखाली
बाजारी विकली ती माता!
अब्रूच्या चिंध्या होताही
प्रवास चालू होता...............

गंगेच्या पाण्यातील फरक काय?
पावित्र्य आणि पाप सारेच त्यात
मळविली पदराची किनार
पावित्र्य ना राखले हीच खंत!
जुगार नात्याचा होताही
प्रवास चालू होता...............

गळा आज गळ्यानेच कापला
मीठी त्या नाराधमाची
प्रेतावर जी चढतील फुले
शेवटी काय कोमेजायाची
शेजारी प्रेत जलताही
प्रवास चालू होता...............

शेवटी आले वळण शेवटचे
आधीही जगून मृत होते
चढतील फुले आणि मगरीचे अश्रू
देह स्त्री जातीचे होते!
राख होऊनही उरताना
प्रवास चालू होता...............
चालून थांबला होता
प्रवास 'स्त्री' जन्माचा!

स्वरचित : प्रिती अ. खेडेकर
१३.७.२००१ शुक्रवार
वेळ : संध्याकाळी ६.००

No comments:

Post a Comment