Tuesday, December 8, 2009

'तू काही देतोस'

प्रेम करण्यासाठी हवे काही
असे जेह्वा सांगतोस
कुरूप या नात्याचे तेह्वा
अर्थाचे गणित मांडतोस!

फिरत होतास तू चांदण्यात
सावलीपासून हरवलास
माझ्या असण्याच्या क्षणातही
'नाही' म्हणून उरलास!

सांगितले शब्दांनी बरेच
तू मूका झालास
माझे अर्थ घेताना
परका 'भाव' बनलास!

त्या एका कातरवेळी
एकटेपण तू दिलेस
माझ्या जीवन बागेत
का तू 'काटे' भरलेस?

तू होतास लाटेवरी
किनारा मला केलेस
विसरून लाटेच्या नात्यात
माझे 'असणे' नेलेस!

स्वप्न तुझ्यातच होती
ना ती जाणलीस
स्वप्न म्हणून उरण्यातही
फक्त 'जाग' दिलीस!

अजूनही त्या वाटेवर
कधी पाउले देतोस
वारा बनून येताना
'ठसे' घेऊन जातोस!

तू येणारच नाही तरी
आठवणीत का येतोस?
माझ्या आठवणीत मग
'खंत' म्हणून उरतोस!

आता मी सावरले तरी
त्याच तिथे उभा असतोस
मी नाही त्या वाटेवर
आठवणींशी का भांडतोस?

येईल कधी ते प्रेम
जेथे तू माझा होतोस
माझ्यातले प्रेम जाणायला
माझ्यातला 'तू' देतोस!

स्वरचित : प्रिती अशोक खेडेकर
दिनांक : २९.०९.२००९
वेळ : रात्री १.४०

No comments:

Post a Comment